जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. तसेच संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येऊन दिवसेंदिवस नियमांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, शहराबरोबरच ग्रामीण भागात तात्काळ कोरोना संशयित व्यक्तीची तपासणी व्हावी म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील ३१९ ठिकाणी रॅपिड ॲन्टीजन टेस्टची सुविधा उपलब्ध केली आहे. आरटीपीसीआर तपासणी ही केवळ विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत होते. उर्वरित ठिकाणी रॅपिड ॲन्टीजन टेस्ट केली जात आहे. या सर्वच ठिकाणी मोफत तपासणी केली जात आहे. याशिवाय, सर्दी, ताप, खोकला अथवा अन्य आजारांच्या रुग्णांची तात्काळ चाचणी व्हावी म्हणून जिल्ह्यातील ७ खाजगी लॅबला कोरोना चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या खाजगी केंद्रावर दररोज साधारणत: १८० जणांच्या तपासण्या होतात. त्यासाठी १ लाख ८ हजारांपर्यंत खर्च होत आहे.
अशी आहे आकडेवारी...
३१४०
जिल्ह्यात दररोज केल्या जाणा-या चाचण्या
२१८७७
चाचण्या झाल्या गत आठवडाभरात
गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात एकूण २१ हजार ८७७ जणांची चाचणी झाली. त्यात २ हजार ८०८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत गेल्या आठवड्यात एकूण ७ हजार ९१८ स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात १ हजार २२४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील शासकीय आरोग्य संस्थांसह खाजगी लॅबमध्ये एकूण १३ हजार ९५९ जणांची चाचणी करण्यात आली असता त्यात १ हजार ५८४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले.
६०० रुपये खर्च येतो एका चाचणीला...
कोरोनाचा संसर्ग राेखण्यासाठी तसेच तात्काळ तपासणीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने जिल्ह्यातील ७ खाजगी लॅबला कोरोना चाचणी करण्यास परवानगी दिली आहे. तिथे दररोज साधारणत: १८० जणांची तपासणी होते.
शासनाच्या निर्देशानुसार खाजगी लॅबमध्ये एका रॅपिड ॲन्टीजन टेस्टसाठी ६०० ते ८०० रुपयांपर्यंत दर आकारले जातात. दररोज लातूरकरांचा १ लाख ८ हजारांपर्यंत खर्च होत आहे.