लातूर, निलंगा - केंद्र शासनाने लागू केलेले तीनही कृषी कायदे रद्द करावेत यासह अन्य मागण्यांसाठी काँग्रेसकडून लातूर, निलंगा येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाल्याने व साथरोग प्रतिबंधात्मक अधिनियमांतर्गत लातूरमध्ये ३५ तर निलंग्यात १८ अशा एकूण ५३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे, शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव, शरद देशमुख, प्रवीण सूर्यवंशी, संजय ओव्हळ यांच्यासह ३५ जणांवर गांधी चौक पोलीस ठाण्यात कलम १८८, २६९, २७० भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर निलंगा शहरातील उपविभागीय कार्यालयासमोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले होते. याठिकाणी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर, अभय सोळुंके, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, गोविंद रामजी शिंगाडे, लाला पटेल, गोविंद सूर्यवंशी, तुराब बागवान, सोमनाथ कदम, सुधाकर पाटील, अजय कांबळे, प्रा. दयानंद चोपणे, नारायण सोमवंशी, महेश देशमुख, पंकज शेळके, सुरेंद्र धुमाळ, अपराजित मरगणे, शरद गायकवाड, तानाजी डोके यांच्यासह १८ जणांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, कोरोना संसर्ग वाढेल अशी घातक कृती करून स्वतःच्या व जनतेच्या जीविताला व्यक्तिगत आरोग्याला बाधा पाेहोचवून कोणतीही सुरक्षेची काळजी न घेता संसर्ग पसरविण्याची हयगय केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलन....
सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन केले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी कितीही वेळा गुन्हा दाखल झाला तरी आम्ही मागे हटणार नाही. सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची लढाई आहे. एकीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते ३५ ते ४० लोक घेऊन राज्यपालांना भेटायला जातात, त्यावेळी संसर्गजन्य रोग प्रतिबंधात्मक कायद्याचे उल्लंघन होत नाही का? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील-निलंगेकर यांनी विचारला आहे.