राजकुमार जाेंधळे / लातूर : शहरातील चार पाेलीस ठाण्यांना वाहन पार्किंगसाठी जागाच नसल्याने माेठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांसह नागरिकांची परवड सुरू आहे. तर कर्मचारी, नागरिकांना आपली वाहने आता ठाण्याबाहेरच रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. परिणामी, रहदारीला अडथळा निर्माण हाेत आहे. आता या बेशिस्तपणे थांबणाऱ्या रस्त्यावरील वाहनांना शिस्त लावण्याची गरज आहे.
लातूर शहरात गांधी चाैक, शिवाजीनगर, एमआयडीसी आणि विवेकानंद चाैक अशी चार पाेलीस ठाणी आहेत. शहराच्या विस्तारिकरणाबराेबरच लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. लातूर ग्रामीण पाेलीस ठाणे वगळता इतर चार पाेलीस ठाण्यांना स्वतंत्र पार्किंगची व्यवस्थाच नाही. परिणामी, ठाण्यात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना आपली दुचाकी, चारचाकी वाहने ठाण्यासमाेरच रस्त्यावर बिनधास्त उभी करावी लागतात. पार्किंगअभावी कर्मचारी, नागरिकांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे. ठाण्याच्या परिसरात असलेली रिकामी जागा ही जप्त करण्यात आलेल्या वाहनांनी, मुद्देमालांनी व्यापली आहे. यातून पार्किंगसाठी वापरात येणारी जागाच गायब झाल्याने, पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे.
गांधी चाैक पाेलीस ठाणे, लातूर
लातूर शहरातील गांधी चाैक पाेलीस ठाण्याच्या परिसरात एकूण तीन कार्यालये थाटण्यात आली आहेत. यामध्ये ठाणे, उपविभागीय कार्यालय आणि शहर वाहतूक शाखेचा कारभार चालताे. त्यातच शहर वाहतूक शाखेच्यावतीने शहरातील वेगवेगळ्या मार्गावर टाेईंग केलेली वाहने आणली जातात. परिणामी, वाहनांची माेठ्या प्रमाणावर वर्दळ येथे कायम असते. आता ठाण्यात स्वतंत्र पुरेशी पार्किंगची व्यवस्था नसल्याने ठाण्यासमाेरील रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागत आहेत.
शिवाजीनगर पाेलीस ठाणे, लातूर
लातुरातील महत्त्वाचा चाैक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चाैकात शिवाजीनगर पाेलीस ठाणे आहे. या ठाण्यालाही पुरेशी जागा उपलब्ध नाही. परिणामी, पार्किंगसाठी जागाच उपलब्ध नाही. आहे त्या जागेत विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेली वाहने, इतर मुद्देमाल ठेवण्यात आला आहे. यातून ठाण्याच्या बाहेरच माेठ्या प्रमाणावर पाेलीस कर्मचारी, नागरिकांना वाहनांची पार्किंग करावी लागत आहे.
लातुरातील चार ठाण्यांना पार्किंगच नाही...
लातूर शहरातील गांधी चाैक, शिवाजीनगर, एमआयडीसी आणि विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यांना स्वतंत्र पार्किंगची व्यवस्थाच उपलब्ध नाही. आहे त्या जागेतच वाहनांचे पार्किंग करावे लागते. जागाच उपलब्ध नसल्याने चक्क रस्त्यावरच वाहनांचे पार्किंग करण्याची वेळ आली आहे. शहराच्या वाढत्या विस्तारिकरणामुळे आता ठाण्यातील उपलब्ध असलेली पार्किंगची जागा अपुरी पडत आहे.
पुनर्बांधणीनंतर सुटणार प्रश्न
लातूर शहरातील प्रमुख चार ठाणी, लातूर ग्रामीण, उदगीर येथील ठाण्यांच्या इमारतीच्या बांधकामाला मंजुरी मिळाली आहे. मात्र, निधीअभावी हे काम रखडल्याची माहिती उपलब्ध आहे. ज्यावेळी या इमारतीची पुनर्बांधणी हाेईल, त्यावेळी आपल्याला पुरेशी जागा उपलब्ध हाेणार आहे. यामध्ये आहे ती जागा अधिक उपयाेगात आणता येणार आहे. गांधी चाैकात एकाच इमारतीत ठाणे, उपविभागीय कार्यालय आणि शहर वाहतूक शाखा सुरू झाल्यावर पार्किंग जागेचा प्रश्न निकाली निघणार आहे.
- निखिल पिंगळे, पाेलीस अधीक्षक, लातूर