कासार-बालकुंदा ते शेतनाकमाळ या रस्त्याचा २५ ते ३० शेतकरी शेतीकडे ये-जा करण्यासाठी वापर करतात. दीड कि.मी.च्या या शेतरस्त्यावर झाडे-झुडुपे वाढली होती. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते नेण्यासाठी, तसेच शेतातील रास घरी घेऊन येण्यासाठी अडचण होत असे. पावसाळ्यात तर रस्त्यावर चिखल होत असे. त्यामुळे शेतकऱ्यांना पशुधन शेतातच बांधावे लागत असे. या समस्येमुळे काही शेतकऱ्यांनी या भागातील शेत तोडून देण्याकडे लक्ष केंद्रित केले होते.
सदरील शेतरस्ता खुला करण्यात यावा, अशी मागणी सातत्याने शेतकऱ्यांतून होत होती. ग्रामपंचायतीकडूनही मागणी होत होती. दरम्यान, नितीन पाटील यांनी ही समस्या आ. अभिमन्यू पवार यांच्याकडे मांडली. तेव्हा त्यांनी हा रस्ता खुला करण्यात येईल असे सांगून त्या कामाचे उद्घाटन केले. त्यानंतर हा रस्ता खुला करण्यात येऊन दीड कि.मी.च्या रस्त्याचे मातीकाम सुरू करण्यात आले आहे. पावसाळ्यात शिवारातील पाणी तळ्यात जाण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूस चर खोदण्यात आले आहेत.
आमदार निधीतून मदत...
सदरील रस्ता कामासाठी आ. अभिमन्यू पवार यांनी प्रति कि.मी. ५० हजार दिले आहेत. उर्वरित रक्कम शेतकऱ्यांनी लोकवाटा जमा करून हे काम पूर्ण करून घेतले आहे. आता एका वेळी दोन बैलगाड्या ये-जा करतील, असा रस्ता बनविण्याचे काम सुरू आहे. लवकरच हे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. रस्त्यामुळे अडचण दूर झाल्याचे शेतकरी हैदर चौधरी व नितीन पाटील यांनी सांगितले.