अहमदपूर : ग्रामीण भागामध्ये २५पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये गृह अलगीकरणाऐवजी संस्थात्मक विलगीकरणातील उपचाराला प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी येथे दिली. अहमदपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. तालुक्यात १ हजार ७६ बाधित रुग्ण आढळले आहेत. या अनुषंगाने पालकमंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. शहरी भागात ४०० रुग्ण असून, ग्रामीण भागात ७०० रुग्ण आहेत. त्यातील गृह अलगीकरणात १,१०२ रुग्ण आहेत. ज्या गावात २५पेक्षा अधिक रुग्ण आहेत, अशी आठ गावे असून, त्या गावातील बाधित रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करून उपचार करावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
शंभर खाटांचे हॉस्पिटल
अहमदपूर तालुक्यातील कोविड केअर सेंटरमध्ये तसेच खासगी रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही. शहरासाठी शंभर खाटांच्या रुग्णालयासाठी प्रयत्न केले जातील. गृह अलगीकरणातील रुग्णांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वयोगटानुसार विभागणी करावी, त्यात शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी यांची स्वतंत्र नोंद करावी, गावात ग्रामरक्षा दल, अँटी कोरोना फोर्स कार्यान्वित करावेत, लॉकडाऊन नियमांचे पालन करावे, अशा सूचनाही पालकमंत्री देशमुख यांनी केल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे, पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ, ॲड. हेमंत पाटील, विकास महाजन, पिराजोद्दीन जहागीरदार, पंचायत समिती सभापती गंगाधर जाभाडे, नगरसेवक संदीप चौधरी, रवी महाजन, डॉ. दत्तात्रय पाटील, डॉ. ऋषिकेश पाटील, आदी उपस्थित होते.