नागरसोगा : औसा तालुक्यातील नागरसोगा व परिसरात यंदा रबीच्या क्षेत्रात वाढ झाली असून गहू, हरभरा, ज्वारी ही पिके बहरत आहेत. सध्या ज्वारीवर माव्यासह चिकट्याचा प्रादुर्भाव झाल्याने वाढ खुंटली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावला असून विविध कीटकनाशकांची फवारणी करीत असल्याचे दिसून येत आहे.
औसा तालुक्यातील नागरसोगा परिसरात यंदा अतिपाऊस झाल्याने या भागातील नदी, नाले, विहिरी तुडुंब भरल्या आहेत. त्याचा रबी हंगामासाठी लाभ झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा, गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनीही रबी ज्वारीची पेरणी केली आहे. सततच्या बदलत्या वातावरणामुळे ज्वारीवर चिकट्यासह माव्याचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
नागरसोगा परिसरातील कोरडवाहू व बागायती शेतकऱ्यांनी जवळपास ५०० एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर रबी ज्वारीचा पेरा केला आहे. ज्वारीचे पीक जोमात आले आहे. वेळेवर पाणी, खते व आंतरमशागतीमुळे ज्वारी जोमदार आहे. मात्र, सध्या ढगाळ वातावरण व थंडीमुळे ज्वारीच्या पानावर चिकट्यासह माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून त्यामुळे ज्वारीची वाढ खुंटली आहे. शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत.
काही शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पानावरील मावा व चिकटा धुवून जाईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, ज्वारीची धाटे उंच असल्यामुळे त्याचा अपेक्षित असा फायदा झाला नाही. किडीचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास उत्पादनात घट होईल, अशी भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.