देवणी : विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद जीवने यांनी गत आठवड्यापासून येथील नगर पंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
तालुक्यातील विविध कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. तसेच काही कर्मचारी कार्यालयीन वेळेतही कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे त्यांच्या वेतनात कपात करुन रक्कम शासनाच्या आरोग्य विभागाला देण्यात यावी. तुरोरी ते तोगरी रस्त्याच्या कामाची चौकशी करुन संबंधितांवर कार्रवाई व्हावी, शहरातील पंतप्रधान आवास योजनेतील लाभधारकांचे थकीत हप्ते त्वरित देण्यात यावे, येथील स्टेट बँक ऑफ इंडियाला कायम शाखाधिकारी द्यावा तसेच नगर पंचायतीला कायम मुख्याधिकारी मिळावा, अशा मागण्यांसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद जीवने यांनी १८ जूनपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.