लातूर : उन्हाळ्यास प्रारंभ झाला की, बाजारपेठेत भाजीपाल्यांची आवक घटते. मात्र, यंदा आवक कायमच आहे. दरम्यान, बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर असून हिरवी मिरची, मेथी, गवार आणि लिंबूच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे.
बाजारपेठेत हिरवी मिरची ३० रुपये, टोमॅटो ५, फूलकोबी ६, चुका ६०, करडई १५, शेवगा २०, गवार ८०, शिमला मिरची १५, काकडी १५, भोपळा १०, दोडका ३०, कारले ४०, वांगी २०, भेंडी ३५, पत्ताकोबी ३, हिरा काकडी १०, कोथिंबीर २५, लिंबू ६०, बीट १०, वरणा शेंगा २० रुपये प्रतिकिलो असा दर आहे. तसेच मेथी पेंढी ५ रुपये, पालक ५ रुपये, शेपू १० रुपये, कांदा पेंढी ५ रुपये दराने विक्री होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या आवक चांगली असल्याने दर स्थिर आहेत.
खाद्यतेल व शेंगदाणेच्या दरात अल्पशी वाढ झाली आहे. तूरडाळीच्या दरात १० रुपयांनी घट होऊन १०० रुपये प्रतिकिलो असा भाव आहे. उर्वरित किराणा साहित्याचे दर स्थिर आहेत. - अयुब शेख, दुकानदार
हिरव्या मिरचीच्या दरात १० रुपयांनी वाढ झाली आहे. तर दोडक्याच्या दरात मात्र २० रुपयांनी घसरण झाली आहे. बहुतांश भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत.
- रमेश चोथवे, भाजीपाला विक्रेता
गत आठवड्याच्या तुलनेत सध्या द्राक्षांची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात घसरण होऊन ५० रुपये प्रतिकिलोपर्यंत भाव उतरले आहेत. सध्या सफरचंदाची आवक कमी असल्याने दरात वाढ कायम आहे.