उदगीर शहरातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. पाेलीस दलाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला उदगीरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. प्रत्येक गणेश मंडळांनी, भाविक-भक्तांनी मंडपामध्येच श्री गणेशाच्या मूर्तीची आरती करुन विसर्जन केले आहे. त्या सर्व मूर्ती नगर पालिका प्रशासनाकडे सुपूर्द केल्या आहेत. त्याच धर्तीवर आता लातूर शहरातील गणेश मंडळ, भाविक-भक्तांनी आपापल्या मंडपामध्ये श्री गणेशाच्या मूर्तींचे विसर्जन करावे. त्यानंतर या सर्व मूर्ती महानगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द कराव्यात, असे आवाहन लातूरचे जिल्हा पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.
काेराेना नियमांचे पालन करा...
आपले सण, उत्सव साजरे करताना प्रत्येकाने काेराेनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. रविवारी हाेणाऱ्या विसर्जन साेहळ्यानिमित्त पाेलीस दलाच्या वतीने चाेख बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे. काेठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याचीही दक्षता घेण्यात आली आहे. गणेश भक्तांनी महानगरपालिकेने निर्माण केलेल्या विविध ठिकाणच्या १८ संकलन केंद्रावर गणेश मूर्ती देता येतील. अन्यथा महानगरपालिकेच्या वतीने जवळपास ३० ठिकाणी मूर्ती संकलनासाठी तयारी ठेवण्यात आली आहेत. त्यांच्याकडे मूर्ती सुपूर्द करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.