जळकोट : तालुक्यातील गव्हाण येथील ग्रामपंचायत निवडणूक दुरंगी झाली. यात पॅनेलप्रमुख व त्यांची मुलगी पराभूत झाली, तर त्याच पॅनेलमधील पती-पत्नीस मतदारांनी कौल दिला.
गव्हाण येथील ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नऊ आहे. या निवडणुकीत गणेश रेकुळवाडी यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचे सहा, तर त्यांच्या विरोधी पॅनेलचे तीन सदस्य विजयी झाले. विशेष म्हणजे, रेकुळवाडी हे स्वत: व त्यांची मुलगी रिंगणात होती. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारले. त्यांच्याच पॅनेलमधील वर्षा गुडसुरे व त्यांचे पती बालाजी गुडसुरे हे विजयी झाले आहेत. त्यामुळे गड आला, पण सिंह गेला, अशी अवस्था गावात झाली आहे. गावातील दोन वॉर्डमधून शीतल गुुंजत विजयी झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना एका ठिकाणचा राजीनामा द्यावा लागणार आहे. शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होऊन गावच्या विकासासाठी पुढाकार घेऊन रेकुळवाडी यांनी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी पॅनेल उभे केले होते. त्यांच्याच पॅनेलमधील बालाजी गुडसुरे व वर्षा गुडसुरे हे पती-पत्नी पदवीधर असून, गावकऱ्यांनी त्यांच्याकडून विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.