ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत स्वत:चा ठसा उमटविण्यासाठी इंग्रजी भाषा अवगत असली पाहिजे. या उद्देशाने गेल्या २७ वर्षांपासून इंग्रजी विषय शिकविण्याचा अनुभव कमल लहाने यांना आहे. लहानेवाडी, सांगवी सुनेगाव, शिवणखेडा आणि काजळहिप्परगा येथील सेवा कालावधीत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले. त्यातूनच अनेक जण डॉक्टर, वकील, इंजिनिअर, संशोधक, फार्मासिस्ट, शिक्षक आदी पदांपर्यंत पोहोचले आहेत. आपला प्रवास उलगडताना शिक्षिका लहाने म्हणतात, गेल्या २७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत ग्रामीण भागात काम करताना विद्यार्थ्यांच्या अडचणी जवळून बघता आल्या. त्यातूनच त्यांच्या जीवनात बदल घडविण्याचा निश्चय केला. याच माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी साहाय्य, शैक्षणिक साहित्याची मदत, अभ्यासातील अडचणी दूर करणे यावर लक्ष केंद्रित करता आले. ज्या शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य केले. तेथील विद्यार्थ्यांच्या नवोपक्रमाला चालना देत यशाचा आलेख तालुक्यातच नव्हे तर जिल्हास्तरापर्यंत पोहोचविला. आयुष्याला कलाटणी देणारे वर्ष नववी आणि दहावीचे त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांची इंग्रजी विषयाची भीती दूर करत त्यांचा पाया भक्कम करण्यावर भर दिला. परिणामी, शेकडो विद्यार्थी आपल्या पुढील आयुष्यात यशापर्यंत पोहोचले असल्याचा मनोदय शिक्षिका कमल लहाने यांनी व्यक्त केला़
सामाजिक कार्यावर दिला भर...
शिक्षण क्षेत्रात काम करताना अनाथ मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणता आल्याची भावना प्रेरणा देणारी आहे. सोबतच ज्या गावात काम करतोय तेथील महिलांना आरोग्याच्या बाबतीत जागृत करणे, महिलांचे मेळावे घेऊन त्यांचे उद्बोधन करणे, १९९४ ते १९९६ या कालावधीत साक्षरता मोहिमेत सक्रियतेने सहभाग घेत अनेकांना साक्षर केले असल्याचा आनंद आहे. शिक्षणासोबतच सामाजिक कार्यावर भर दिल्यास अनेकांच्या प्रगतीला हातभार लागतो, अशी भावना कमल लहाने यांनी व्यक्त केली़