उपकेंद्राच्या दाराला लावलेल्या कुलपांमध्ये खडे अज्ञाताकडून टाकल्याने शनिवारपासून केंद्र कुलूपबंद बंद होते. बुधवारी लोकप्रतिनिधी व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष या घटनेचा पंचनामा करून कुलूप तोडण्यात आले.
हंडरगुळी आरोग्य केंद्रांतर्गत हाळी, हंडरगुळी, वाढवणा खु., तोंडार आदी चार आरोग्य उपकेंद्र आहेत. हंडरगुळी येथील आरोग्य उपकेंद्र व परिसरात विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यासह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हंडरगुळी येथे आरोग्य केंद्र असले तरी रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेता हाळी व हंडरगुळी या दोन्ही गावांत आरोग्य सेवेसाठी उपकेंद्रांची निर्मिती करण्यात आली. या उपकेंद्रातून गरोदर मातांची तपासणी, आरोग्य मार्गदर्शन, बालकांचे लसीकरण केले जाते. वेळोवेळी ग्रामपंचायतीकडून व आरोग्य विभागाकडून आरोग्यविषयक साहित्य पुरविण्यात आले. मात्र, हंडरगुळी आरोग्य उपकेंद्राच्या समस्या अद्यापही कायम आहेत. आरोग्य उपकेंद्राच्या संरक्षण भिंतीची पडझड झाल्याने माेकाट जनावरांसह मद्यपींचा वावर वाढला आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. मुख्य प्रवेशद्वार मोडकळीस आणले गेले आहे. परिसरात कपडे सुकवणे, जनावरे बांधणे असे प्रकार केले जात आहेत. स्वच्छतागृहात दगड, कचरा टाकला जात आहे. प्रसूतीगृह फरशी उखडली आहे. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उपकेंद्राला वीजपुरवठा नाही. परिणामी, कामकाजासाठी अडचण येत आहेत. उपकेंद्रात असलेल्या समस्या व अज्ञाताकडून होणारा त्रास याबाबत ग्रामपंचायत व वरिष्ठांकडे लेखी स्वरूपात कळविले जाईल, असे हंडरगुळी येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ.आकाश पवार म्हणाले. तर आरोग्य उपकेंद्राच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही हंडरगुळी येथील सरपंच विजय अंबेकर म्हणाले.