वलांडी : देवणी तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा नदीपात्रात म्हैस गेल्याने तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत असताना गुणवंत उर्फ प्रथमेश धनाजी सोमवंशी (वय १८) हा बारावीचा विद्यार्थी पाण्यात बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. अग्निशमन दलाच्या टीमने सायंकाळपर्यंत विद्यार्थ्याचा शोध घेतला. मात्र, अंधार झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.
धनेगाव येथील गुणवंत उर्फ प्रथमेश धनाजी सोमवंशी (वय १८) हा श्री महादेव माध्यमिक व उच्च माध्यमिक येथे बारावीची परीक्षा देत असून, मंगळवारी दुपारी म्हैस चारण्यासाठी तो गेला होता. दरम्यान, म्हैस पाण्यात गेल्याने तिला बाहेर काढण्यासाठी गुणवंत उर्फ प्रथमेश पाण्यात उतरला. मात्र, पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाल्याची माहिती नदीच्या पैलतीरावरील शेतकऱ्यांनी दिली. विद्यार्थ्याला बाहेर काढण्यासाठी उदगीर येथील अग्निशामन दलाची रेस्क्यू टीम धनेगाव धरण क्षेत्रावर दाखल झाली. त्यांच्याकडून सायंकाळपर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, अंधार पडल्याने काम थांबविण्यात आले असून, बुधवारी सकाळी शोधमोहीम पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
पाण्याचा अंदाज न आल्याने घटना...गुणवंत उर्फ प्रथमेश याचे वडील पुणे येथे मजुरी करतात तर आई रोजंदारीने कामावर जाते. आईला हातभार लावावा व मंगळवारी परीक्षा नसल्याने गुणवंत शेतात जाऊन म्हैस चारत होता. मात्र, म्हैस पाण्यात गेल्याने तिला बाहेर काढण्यासाठी तो पाण्यात गेला. पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाल्याची माहिती पैलतीरावरील शेतकऱ्यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.