लातूर : कोरोनाच्या संकटामुळे शाळा- महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइनचा उपक्रम राबविण्यात आला. आता प्रत्यक्ष नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र, अभ्यासक्रम पूर्ण होतो की नाही, अशी पालक- विद्यार्थ्यांना चिंता आहे. आता परीक्षा तोंडावर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नसल्याने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहावे लागले. आता शाळा सुरू झाल्या असून, जिल्ह्यात ४८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे. आजमितीस दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्के तर बारावीचा अभ्यासक्रम ३० टक्के झाला आहे. ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन वर्गामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाते. आता परीक्षा महिना-दीड महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच अभ्यासक्रमही पूर्ण झालेला नाही. परीक्षेपर्यंत अभ्यासक्रम पूर्ण होईल का, असा प्रश्न असल्याने, पालक, विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दहावीचा अभ्यासक्रम
शाळा सुरू होऊन दीड महिना होत आला आहे. अभ्यासक्रम २५ ते ३० टक्के पूर्ण झाला आहे. मोजक्याच धड्यावर विद्यार्थ्यांची परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांवर ताण येणार आहे. मार्च महिन्यापर्यंत दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण केला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले.
बारावीचा अभ्यासक्रम
दहावीनंतर बारावीचे वर्ग जवळपास दोन आठवड्यांनंतर सुरू झाले. २० ते २५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. ऑनलाइनलाही विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आहे. सर्वसाधारण २५ टक्के अभ्यासक्रम कमी केला आहे. तरीही उरलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त तासिका घ्याव्या लागतील.
परीक्षा जवळ आल्या असल्याने अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करावा. लाॅकडाऊन काळात अभ्यासावर भर दिला. मात्र, काही अडचणी आल्यास शिक्षकांना विचारण्यास शाळा सुरू नव्हत्या. आता शाळा सुरू असल्याने अभ्यासातील अडचणी दूर करण्यास मदत होत आहे.
- दहावीचा विद्यार्थी
महाविद्यालय उशिरा सुरू झाल्याने अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. त्यामुळे वैयक्तिक अभ्यासावर अधिक भर दिला जात आहे. शिक्षकांचे मागर्गदर्शनही मिळत आहे. वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यास बोर्ड परीक्षेचा सराव करता येईल.
- बारावीचा विद्यार्थी