लातूर : शहरासह जिल्हाभरात कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस झपाट्याने वाढतो आहे. जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर उपचार केले जात आहेत. काही ठिकाणी रुग्णालयाच्या बाहेर नातेवाइकांचे मात्र हाल होत आहेत. त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था नसल्याने परवड सुरू आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यात रेणापूर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, उदगीर, तोंडारपाटी, निलंगा, औसा, शिरूर अनंतपाळ आदी ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांच्या तपासणीबरोबर उपचाराची यंत्रणा उभारण्यात आली आहे. रुग्णालयात रुग्णांची सोय होत असली, तरी बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांची मात्र गैरसोय होत असल्याचे समोर आले आहे.
सध्या रुग्णालय परिसरातील हाॅटेल, दुकाने आणि खानावळ बंद आहेत. परिणामी, बाहेरगावच्या नातेवाइकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी स्थानिक नातेवाइकांकडून डब्याची व्यवस्था केली जात आहे. किमान मूलभूत सुविधा पुरविण्याची मागणी नातेवाइकांकडून होत आहे.