बनीम का जाळलास म्हणून मारहाण
लातूर : गेल्या वर्षी सोयाबीनची बनीम जाळल्याच्या कारणावरून संगनमत करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना शिरूर अनंतपाळ तालुक्यातील वळसांगवी येथे १३ मार्च रोजी घडली. याप्रकरणी फिर्यादी दशरथ रंगराव बिरादार यांच्या तक्रारीवरून कालिदास भीमराव बिरादार व सोबत असलेल्या दोघांविरुद्ध शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वामी करीत आहेत.
खाडगाव परिसरात मोकळ्या प्लॉटवर कचरा
लातूर : शहरातील खाडगाव परिसरात मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. नियमित घंटागाडी येत नसल्याची नागरिकांची ओरड आहे. घंटागाडी येत नसल्याने रस्त्याच्या कडेला, मोकळ्या प्लॉटवर कचरा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात शहर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने नियमित घंटागाडी सुरू करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
उड्डाणपुलाच्या भिंतीची रंगरंगोटी मोहीम
लातूर : शहरातील उड्डाण पुलाच्या रंगरंगोटीची मोहीम हाती घेण्यात आली आहे. स्वच्छ शहर सुंदर शहर या उपक्रमांतर्गत आकर्षक रंगरंगोटी केली जात आहे. विविध प्रकारचे संदेश देणारी चित्र रेखाटली जात असून, वाहनधारकांचे लक्ष वेधून घेत आहे. आतापर्यंत अर्धे काम पूर्ण झाले असून, लवकरच संपूर्ण रंगरंगोटी पूर्ण केली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
शहरातील बाजारात भाजीपाल्याची आवक
लातूर : शहरातील भाजीपाला बाजारात शेतमालाची आवक वाढली आहे. दररोज सायंकाळच्या वेळी ग्रामीण भागातून भाजीपाला विक्रीसाठी दाखल होत आहे. आवक वाढली असल्याने दरही स्थिर आहेत. यासोबतच उन्हाचा पारा वाढत असल्याने रसाळ फळांना मागणी होत आहे. टरबूज, द्राक्ष, सफरचंद, मोसंबी, संत्री आदी फळांना ग्राहकांची पसंती आहे. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत व्यवहार पार पाडले जात आहेत.
शहरात रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात रात्री ८ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी पुकारण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातील बार्शी रोड, रेणापूर नाका, औसा रोड, नांदेड नाका आदी भागात वाहनांच्या तपासणीसाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे.