आठवडाभरापासून जळकोट तालुक्यात पाऊस होत आहे. दरम्यान १३ जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या भागातील काही शेतकऱ्यांच्या पिकांत पाणी साचले आहे. तसेच काही शेतकऱ्यांच्या जमिनीवरील माती खरडून गेली आहे. त्यामुळे नुकसान झाले आहे. जोरदार पावसामुळे काही ठिकाणच्या पुलांवर खड्डे पडले आहेत. रावजी तांडा व थावरु तांडा या दोन तांड्या जोडणाऱ्या मार्गावरील पूल वाहून गेला आहे. परिणामी, या तांड्यावरील नागरिकांना ये- जा करण्यास अडचण निर्माण झाली आहे. तांड्याची लोकसंख्या ४०० ते ५०० च्या जवळपास आहे. रात्री- अपरात्री एखादा रुग्ण गंभीर झाल्यास त्याला रुग्णालयात कसे घेऊन जावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. या पुलाचे तत्काळ बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सरपंच शिरीष चव्हाण यांच्यासह रावजी व थावरू तांड्यावरील नागरिकांनी केली आहे.
मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून, नागरिकांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:17 IST