बेलकुंड गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने गावच्या सीमेवर ॲन्टी कोरोना फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे गावात ये- जा करण्यांची चौकशी केली जात आहे. शिवाय, गावात ज्या भागात बाधित आढळले आहेत, तिथे नागरिकांना ये- जा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक वॉर्डातील घरांतील व्यक्तींच्या आरोग्याची दररोज विचारपूस करण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर सोपविण्यात आली आहे. प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यास त्यांनी तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
दररोज बैठका घेऊन सूचना...
ग्रामपंचायतीच्या वतीने दररोज बैठका घेऊन कोरोनासंदर्भात आवश्यक त्या सूचना केल्या जात आहेत. गावातील व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. शासनाच्या निर्णयाची माहिती गावकऱ्यांना वेळोवेळी ध्वनीक्षेपक व वॉटस्अप ग्रुपच्या माध्यमातून दिली जाते. गावातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. आजार अंगावर काढू नये.
- विष्णू कोळी, सरपंच.