विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट रेखाकला परीक्षा घेतल्या जातात. या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना ग्रेडनुसार दहावी बोर्ड परीक्षेत गुण दिले जातात. मात्र, यंदा कोरोनामुळे रेखाकलेच्या दोन्ही परीक्षा झालेल्या नाहीत. त्यामुळे दहावीच्या वर्गातील चित्रकलेची अंतिम परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण मिळणार नाहीत. दरम्यान, अनेक विद्यार्थी सातवी आणि आठवीच्या वर्गातच या परीक्षा देतात. त्यामुळे त्यांना तरी चित्रकला गुण द्यावेत, अशी मागणी कलाशिक्षकांमधून होत आहे. लातूर बोर्डाकडेही चित्रकला गुणांसाठी प्रस्ताव दाखल झाले असून, पुढील कार्यवाहीसाठी ते राज्य मंडळाकडे पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे रेखाकलेचे गुण मिळणार की नाही, याबाबत विद्यार्थी, कलाशिक्षकांमध्ये संभ्रम आहे.
ग्रेडनुसार मिळणारे गुण...
ए - ७
बी - ५
सी - ३
मागील वर्षी बोर्डाकडे सादर प्रस्ताव - ३,३०१
अपात्र ठरलेले प्रस्ताव - २५३
रेखाकलेचे गुण मिळालेले विद्यार्थी - ३,०४८
मागील दोन वर्षांत ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे, त्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय न करता रेखाकलेचे गुण देण्यात यावेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांचा विचार करता रेखाकला परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुण देण्यात यावेत.
-महादेव खळुरे, कलाशिक्षक
दरवर्षी चित्रकलेची परीक्षा घेतली जाते. हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. दोन सत्रांत परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना प्रतिसाद चांगला असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे परीक्षा झालेल्या नसल्याने मार्क न देण्याचा निर्णय आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा आहे. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना प्राप्त प्रस्तावानुसार मार्क देण्यात यावेत.
-अशोक तोगरे, कलाशिक्षक
आम्ही रेखाकलेच्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत. बोर्डात शाळेच्या वतीने प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे गुण देण्यात यावेत. गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.
-सृष्टी धडे, विद्यार्थिनी
चित्रकलेच्या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असलेल्यांनी गुणांसाठी प्रस्ताव दाखल केले आहेत. अनेक जण दहावीच्या वर्गात असताना चित्रकलेची अंतिम परीक्षा देणार होते. मात्र, कोरोनामुळे चित्रकला परीक्षा होऊ शकली नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
-नम्रता कनामे, विद्यार्थिनी