अहमदपूर : अहमदपूर पालिकेच्या वतीने बारकोड व मोबाईल ॲपद्वारे घराची नोंद करून घनकचरा संकलन केला जाणार आहे. जिल्ह्यात असा पहिलाच प्रयोग आहे. त्यामुळे कमीत-कमी दरात अधिक घनकचरा जमा होऊन त्याचे व्यवस्थापन होणार आहे.
अहमदपूर पालिकेअंतर्गत १७ हजार मालमत्ताधारक आहेत. शहरात दररोज दहा टनांपेक्षा जास्त कचरा जमा होत असून, त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी दरवर्षी निविदा सादर केल्या जातात. मात्र, यावर्षी मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांच्या संकल्पनेतून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घनकचरा व्यवस्थापन केले जाणार आहे. त्यात शहरातील सर्व मालमत्ताधारकांना एक बारकोड दिला जाणार असून, कचरा व्यवस्थापन करणारा कर्मचारी आपल्या मोबाईल ॲपद्वारे त्या बारकोडवर स्कॅन करेल आणि दररोज कचरा घेऊन जाईल. एखाद्या दिवशी त्यांनी स्कॅन नाही केल्यास कचरा घेऊन गेला नाही, असे सिद्ध होणार आहे.
७० रुपये दर महिना दराने कचरा संकलन केेले जात असून, त्यातच त्याचे विलगीकरण करणे बंधनकारक आहे. त्यात प्लास्टिक कचरा, ओला कचरा असे विलगीकरण करणे, घनकचरा केंद्रावर वाहतूक करणे, त्यावर प्रक्रिया करणे, ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट करणे, प्लास्टिकचा पुनर्वापर करणे व त्याची विक्री करणे अशी बंधने लागू करण्यात आली आहेत. या घनकचऱ्याबरोबर शहरातील नाल्या काढण्यासाठी जीपीआरएसचा वापर होणार असून, प्रत्येक मीटरप्रमाणे त्याचा दर ठरविण्यात आला आहे. तसेच या घनकचरा व्यवस्थापनाचे चार टप्पे असून, पहिल्या टप्प्यात संकलन, दुसऱ्या टप्प्यात वर्गीकरण, तिसऱ्या टप्प्यात वाहतूक व चौथ्या टप्प्यात घनकचरा प्रक्रिया गृहीत धरून काम करण्यात येणार आहे. तसेच आवश्यक असणाऱ्या कच-याचे रिसायकल करण्यासाठीसुद्धा यंत्रणा उभी करावी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य प्रदूषण मंडळाच्या निर्देशाप्रमाणे हा घनकचरा जमा करायचा असून, झिरो गार्बेज पद्धत वापरली जाणार आहेत. त्यामुळे शहरातील कचरा संकलन प्रत्येक घराची ॲपद्वारे नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासन व नागरिकांनाही घनकचरा व्यवस्थापनाची इत्यंभूत माहिती मिळणार आहे. या आधुनिक तंत्रज्ञानामुळे होणारा अनियमितपणा कमी होणार असून, त्यासाठी सर्वच नगरसेवकांनी सहकार्य केले असल्याचे नगरपरिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
अनियमितता कमी...
दरवर्षी मनुष्यबळ कमी असणे, वाहन नादुरुस्त असणे, कचरा न उचलणे अशा अनेक समस्या येत होत्या. त्या समस्येवर मात करण्यासाठी बारकोड पद्धत लागू केली असून, मोबाईल ॲपद्वारे या व्यक्तीने जमा केलेल्या घराच्या तपशिलाची नोंद ठेवली जाणार आहे. तंत्रज्ञानामुळे अनियमितता कमी होणार असल्याचे पालिकेचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.
कचरा संकलन न केल्यास दंडाची तरतूद...
नगरपरिषदेने अभ्यासपूर्ण पद्धतीने निवेदन तयार केले असून, त्यात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तसेच एखाद्या मिळकतीच्या कचरा न उचलल्यास व त्यासंबंधी तक्रार आल्यास २०० रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्यामुळे शहरात स्वच्छता होणार असल्याचे नगराध्यक्ष अश्विनीताई कासनाळे यांनी सांगितले.