अहमदपूर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पाचशेवर गेली असून, साेमवारी शहरांमध्ये ४० नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर अहमदपूर तालुक्यात ४० असे एकूण ८० रुग्ण एका दिवसात आढळले आहेत. मागील पाच दिवसांपासून सरासरी १०० च्या संख्येत रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आठवडी बाजार बंद असतानाही अहमदपूर शहरातील सोमवारचा आठवडी बाजार जिल्हा परिषदेच्या मैदानाच्या बाहेरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर भरला. या बाजारात ग्रामीण भागातून आलेले शेतक-यांनी आपली दुकाने थाटली हाेती. त्यांचा माल खरेदी करण्यासाठी हजारो नागरिकांनी गर्दी केली हाेती. विशेष म्हणजे, बऱ्याच नागरिकांनी मास्क घातलेला नसल्याचे दिसून आले. त्याचबराेबर व्यापारीही विनामास्कच दिसून आले. याबाबत नगरपरिषदेची कुठलीही यंत्रणा जिल्हा परिषद मैदानावर हजर नव्हती. मागच्या वेळेस नगरपरिषदेने ट्रॅक्टरमध्येच भाजीपाला व इतर साहित्य जप्त करुन बाजार उठवला होता. यावेळी मात्र तशी कुठलीही कारवाइ नगरपरिषदेच्या यंत्रणेकडून करण्यात आली नसल्याचे दिसून आले नाही. परिणामी, काेराेनाच्या काळात साेशल डिस्टंसिंगचा फज्जा उडला असल्याचे चित्र दिसून आले.
ग्रामीण भागातील समित्या नावालाच...
कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पहिल्या टप्प्यात तयार करण्यात आलेल्या ग्राम समित्या या कागदावरच राहिल्याचे चित्र सध्याला आहे. याबद्दल कुठल्याही प्रकारची प्रशासनाने तसदी घेतली नाही. केवळ कागदावरील लेखी आदेशावर ग्रामसभा काम करत असून, संबंधित प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अहमदपूर तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. यातून दिवसेंदिवस बाधितांचा आकडा वाढत आहे.
तहसील कार्यालय केले सील...
अहमदपूर येथील तहसील कार्यालयात एक कर्मचारी आणि दोन तलाठ्यांचा अहवाल काेराेना पाॅझिटिव्ह आला आहे. त्यानंतर तातडीने तहसील कार्यालय रिकामे करण्यात आले आहे. त्याचबराेबर सॅनेटायझर करण्यात आले आहे. एक दिवसासाठी सदरचे तहसील कार्यालय सील करण्यात आले आहे. नागरिकांनीही ज्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अशांनीच कार्यालयात कामकाजासाठी यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.