निलंगा : रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असलेले मैत्रीचे नाते जागवीत अपघातग्रस्त दोस्तासाठी महाविद्यालयातील युवक-युवती एकत्र आले. कोणाचीच ऐपत नव्हती. मात्र, हिंमत मोठी. सगळ्यांनी मिळून अनेकांच्या दारी जाऊन मित्रासाठी मदतरूपी आशीर्वाद मागितले. आर्थिक परिस्थिती जेमतेम असलेल्या दोस्तासाठी अडीच लाख रुपये जमवून त्याच्या आईकडे सुपुर्द केले.
नॉट मी, बट यू... असे ब्रीद घेऊन श्रमसंस्कार रुजविणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी आपली सेवावृत्ती दाखवून दिली. निलंग्यातील महाराष्ट्र महाविद्यालयातील बी.कॉम. द्वितीय वर्षात शिकणारा अमोल गणपत वाघमारे याचे परीक्षेचे प्रवेशपत्र घरी विसरले होते. ते आणण्यासाठी अमोल २३ ऑगस्ट रोजी घराकडे निघाला असता एका दुचाकीने जबर धडक दिली. त्यात त्याच्या मेंदूला गंभीर इजा झाली. दरम्यान, त्याच्यावर लातुरातील रुग्णालयात उपचार सुरू झाले. घरची परिस्थिती बेताची. कुटुंब अल्पभूधारक. एक लहान भाऊ आणि आई घरकाम करते. अमोल मात्र शिक्षण घेत इलेक्ट्रिशियनची किरकोळ कामे करतो. स्वभाविकच त्याच्या उपचाराचा खर्च आईला परवडणारा नव्हता. अशा वेळी एनएसएसमधून सामाजिक जाणिवेचे धडे घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शहरात मदतफेरी काढून अडीच लाख रुपये जमविले.
वृंदावन घायाळ, शायरान ढगे, संतोष जाधव, आकाश पोतदार, मयुरी लाटे यांच्यासह एनसीसी आणि एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी जमविलेला निधी प्राचार्य डॉ. एम.एन. कोलपुके आणि उपप्राचार्य प्रशांत गायकवाड यांच्याकडे सुपुर्द केला. तर महाविद्यालयाने हा निधी तातडीने आईच्या स्वाधीन केला. विद्यार्थ्यांनी केलेल्या धडपडीचे संस्थाध्यक्ष विजय पाटील निलंगेकर यांच्यासह शिक्षकांनी कौतुक केले.