अहमदपूर तालुक्यातील खंडाळा येथील मोबाईल टॉवरच्या २४ बॅटऱ्या (अंदाजे किंमत २४ हजार रुपये) १० ते १४ मेच्या दरम्यान चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी गणेश जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यावरून किनगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. किनगाव पोलिसांनी २४ तासांत गुन्ह्यातील आरोपींना गजाआड केले.
उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लंजिले, सपोनि शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे, पोहेकॉ रामचंद्र गोखरे, पोना. व्यंकट महाके, पोना. सुग्रीव देवळे, पोलीस शिपाई नागनाथ कातळे, होमगार्ड प्रताप गायकवाड, व्यंकट दहिफळे यांनी तपासाची चक्रे फिरवून गुप्त माहितीच्या आधारे प्रथम शंभूदेव नागोराव चव्हाण (२८, रा. पार) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली देऊन माहिती दिली.
पोलिसांनी शंभुदेव चव्हाण यांच्या घरातून २४ पैकी १० बॅटऱ्या हस्तगत केल्या. गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हे अर्जुन गोविंद चव्हाण (२९, रा. पार) याच्याकडून ताब्यात घेतले. पोलिसांनी अर्जुन चव्हाण, उमाकांत बाबूराव चव्हाण (३९, रा. रुध्दा), अशिफ हसनसाब शेख (३८, रा. अहमदपूर) अशा चौघांना अटक केली. मंगळवारी आरोपींना अहमदपूर न्यायालयासमोर हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ. रामचंद्र गोखरे हे करत आहेत.