चाकूर तालुक्यातील सर्वात मोठी व आर्थिक विकासाबरोबर उत्पन्न गटात प्रथम क्रमांकाची नळेगाव ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीअंतर्गत ६ वाड्यांसह एकूण ६ प्रभाग आहेत. एकूण १७ सदस्य असून, त्यात ९ महिला व ८ पुरुष उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. या निवडणुकीत प्रभाग रचनेत फेरबदल झाल्याने काहींना आनंद तर काहींना अडचणी निर्माण झाल्या आहेत.
नळेगाव ग्रामपंचायतीसाठी ९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २२ जणांनी माघार घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात ७१ जण आहेत. दरम्यान, चौरंगी लढत होत असून त्यात तीन अपक्ष आपले नशीब आजमाविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नवीन चेहरे रिंगणात...
नळेगावातील ग्रामपंचायत निवडणुकीत जुन्याबरोबर नवीन चेहरे रिंगणात उतरले आहेत. माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव बुदरे, माजी उपसरपंच सूर्यकांत चव्हाण यांचे पॅनल आहे. नवीन चेहऱ्यांमध्ये गणेश सिंदाळकर, माजी चेअरमन सुनील पाटील यांचे पॅनल आहे. गावात प्रथमच चौरंगी लढत होत आहे. त्यामुळे रंगत वाढणार आहे.