जळकोट तालुक्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले असून जनतेने घाबरून न जाता सावधानता बाळगावी. आरोग्य खात्याने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. शारीरिक अंतर पाळून मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणा उपचारासाठी सक्षम असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.जगदीश सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पवार, प्रशांत कापसे, कोरोनाचे नोडल ऑफिसर डॉ. सतिष हरिदास यांनी सांगितले. जळकोट येथील एका खाजगी शाळेतील ४ शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्याने शाळेत व शहरात एकच खळबळ उडाली आहे. सदरील शिक्षकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर उर्वरित २१ शिक्षकांची तपासणी करण्यात आली. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचीही तपासणी करण्यात आली असून सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला नसल्याची माहिती डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.
जळकोटमध्ये एकाच शाळेतील चार शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:25 IST