खंडाळी : दुर्धर आजाराच्या व्याधीवर मात करीत आलेल्या परिस्थितीशी दोन हात करीत अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील एका शेतकऱ्याने ४० गुंठ्यात मिरचीची लागवड केली. बाजारपेठेतही चांगला भाव असल्याने त्यांना हिरवी मिरचीतून चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे त्यांची तालुकाभर चर्चा होत आहे.
अहमदपूर तालुक्यातील खंडाळी येथील शेतकरी अंकुश उत्तमराव पौळ यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर आहे. त्यातून मिळेल त्या उत्पन्नावर संसाराचा गाडा हाकत असत. दरम्यान, त्यांना दुर्धर आजार झाला. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांचा उजवा पाय काढावा लागला. अशा परिस्थितीत मानसिक ताणतणाव निर्माण होण्याबरोबर आर्थिक संकटही उभे राहिले. मात्र, ते डगमगले नाहीत. त्यांनी आलेल्या परिस्थितीशी दोन हात करण्यास सुरुवात केली. शेतीकामासाठी त्यांना दोन मुले मदत करतात.
शेतकरी अंकुश पौळ यांनी ऑगस्टमध्ये चार बाय दीड अशा अंतरावर मिरचीची लागवड केली. लागवडीपूर्वी त्यांनी जमिनीची योग्य मशागत करून घेतली. त्यानंतर मिरचीच्या १८ हजार रोपांची लागवड केली. मिरचीवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दर पाच दिवसाला फवारणी केली. तसेच आवश्यक खतांची मात्राही दिली. खुरपणी तीन- चार वेळेस केली. दरम्यान, त्यांची हिरवी मिरची बहरु लागली. बाजारपेठेत चांगला दर असल्याने त्यांनी तोडणी करून विक्री करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत खर्च वगळता ३ लाख ७० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. आणखीन एक ते दीड लाखांचे उत्पन्न मिळेल, अशी आशा आहे.
आतापर्यंत ७० हजारांचा खर्च...
शेतकरी पौळ यांनी आतापर्यंत खते, कीटकनाशक फवारणी, वाहतूक, मजुरीसाठी असा एकूण ७० हजारांचा खर्च केला आहे. हा खर्च वगळता सध्या ३ लाख ७० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे त्यांची तालुकाभर चर्चा असून त्यांची हिरवी मिरची पाहण्यासाठी शेतकरी भेटी देत आहेत.
शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये...
आलेल्या प्रत्येक संकटावर शेतकऱ्यांनी मात केली पाहिजे. परिस्थितीमुळे हतबल होऊ नये. नियोजनपूर्वक शेती केल्यास निश्चित चांगले उत्पादन मिळते, असे शेतकरी अंकुश पौळ यांनी सांगितले.