प्रत्येक नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने विशेष प्राधान्य दिले आहे. त्या माध्यमातूनच विविध योजनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंमलात आणल्या आहेत. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना आरोग्य सेवा व सुविधा तात्काळ प्राप्त व्हाव्यात या उद्देशाने माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून मतदारसंघातील विविध आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका देण्याचे नियोजन केले आहे. विशेषतः कोरोनाच्या संसर्गाने दर्जेदार आरोग्य सेवा व सुविधांसाठी प्रभावी माध्यम ठरणा-या रुग्णवाहिकेचे महत्वही तितकेच अधोरेखित झाले आहे. काही दिवसांपूर्वीच माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या स्थानिक विकास निधीतून निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी दोन, शिरुर अनंतपाळ ग्रामीण रुग्णालयासाठी एक तर साकोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एक अशा चार रुग्णवाहिकेचे लोकार्पण डॉ. समिधा अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
लवकरच अद्ययावत रुग्णवाहिका मिळणार...
या चार रुग्णवाहिकांचे लोकार्पण केल्यानंतर लवकरच मतदारसंघातील आणखी ८ आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आठ रुग्णवाहिका प्राथमिक आरोग्य केंद्र हलगरा, निटूर, अंबुलगा (बु.), पानचिंचोली, बोरोळ, वलांडी तर ग्रामीण रुग्णालय औराद शहाजानी व देवणीच्या ग्रामीण रुग्णालयासाठी असणार आहेत. या रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा व सुविधा प्राप्त होणार आहेत. विशेष म्हणजे, या रुग्णवाहिका अद्यावत असल्यामुळे गरजू रुग्णांना जीवनदान देण्यासाठी त्या अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत.