चापोली येथील शेत शिवारास शुक्रवारी दुपारी २.३० वा.च्या सुमारास अचानकपणे आग लागली. उन्हाळ्याचे दिवस, दुपारची वेळ असल्यामुळे आणि वाऱ्यामुळे आगीने उग्र रूप धारण केले. यात जवळपास २५ एकर शेत शिवार जळून भस्मसात झाले. आगीत जीवितहानी झाली नसली, तरी येथील
शेतकरी नंदकुमार होनराव, सरोवर शेख, हाफिज शेख, श्रीकांत होनराव, हुसेन शेख, परमेश्वर होनराव यांनी जनावरांसाठी जमा करुन ठेवलेल्या कडब्याच्या व गवताच्या बनिमी, सोयाबीन व तुरीची गुळी, शेती पिके व फळझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही आग लागल्याचे समजताच पांडुरंग बुंदराळे, नागनाथ होनराव, सरोवर शेख, महेश होनराव, हाफिज शेख, हुसैन शेख, सुमित होनराव, अमित होनराव, महंमद शेख यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी ५वा.च्या सुमारास ही आग आटोक्यात आली.
दोन महिन्यांतील तिसरी घटना...
माळरान व शेत शिवारामध्ये अचानक आग लागल्याने, शेकडो एकरावरील शिवार जळून खाक झाल्याची चापोली परिसरातील ही दोन महिन्यांतील तिसरी घटना आहे. यापूर्वी २१ डिसेंबर रोजी हिप्पळनेर येथील माळरानावर आग लागून ७२ एकरांवरील शिवार जळला होता. २ मार्च रोजी चापोली येथील माळरानावर शिवारात आग लागल्याने ११५ एकरांवरील शिवार जळाला. या तिन्ही घटनांत आगीचे कारण हे अस्पष्ट आहे.