:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेणापूर शहर आणि पिंपळफाटा येथे विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकावर रेणापूर पाेलीस, नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कार्यवाई करण्यात आली. यातून एकूण ३५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर शेरा येथील एका लग्नसाेहळ्यात माेठ्या प्रमाणावर गर्दी जमविल्याप्रकरणी प्रशासनाकडून दहा हजारांचा दंड ठाेठावला आहे.
लातूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला असून, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. रेणापूर नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्याची माेहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला गुरुवारपासून रेणापूर-औसा विभागाचे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, रेणापूर येथील तहसीलदार राहुल पाटील, रेणापूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक नानासाहेब उबाळे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, रेणापूर नगरपंचायतीचे पाणीपुरवठा प्रमुख विभुते यांनी रस्त्यावर उतरत विन मास्क फिरणाऱ्या, वाहन चालविणाऱ्या नागरिकांसह वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. शनिवारअखेर ३५० जणावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांच्याकडून जवळपास ३५ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यात रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, ही संख्या आणि काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी राज्य शासन आणि जिल्हा, स्थानिक प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. मात्र, काही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समाेर आले आहे. अशा नागरिकांवर प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. रेणापूर आणि पिंपळफाटा येथील पाेलीस प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात आहे. याची नाेंदही पाेलीस ठेवत आहेत. विनाकारण, विनामास्क फिरणाऱ्यांना दंड केला जात आहे.
लग्नसाेहळा अयाेजकांवरही झाली कारवाई...
रेणापूर तालुक्यातील शेरा येथे एक लग्न साेहळा हाेता. दरम्यान, या लग्न साेहळ्यासाठी माेठ्या संख्यने पाहुणे-रावळे एकत्रित आले हाेते. लग्न साेहळ्यासाठी एकत्रितपणे जमलेल्या नागरिकांवर स्थानिक प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दहा हजारांचा दंड वसूल करण्यात आला. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन, जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियमावली ठरविण्यात आली आहे. या नियमांचे पालन हाेत नसल्याचे समाेर आले आहे. लग्न साेहळे, इतर गर्दीचे कार्यक्रम बिनधास्तपणे आयाेजित केले जात आहेत. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची संख्याही माेठी आहे. काही नागरिकांकडून काेराेनाच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे.