हलगरा येथील ग्रामपंचायत सदस्यांना बँक स्टेटमेंट देण्यात यावे. सन २०१७ पासून झालेल्या आर्थिक व्यवहाराचा लेखी हिशोब द्यावा, औराद शहाजानी ते हलगरा पाणीपुरवठ्याची जलवाहिनी चुकीची केली आहे. सन २०१८ च्या वॉटर कप स्पर्धेतील १५ लाखांच्या बक्षिसाचा हिशोब द्यावा. ग्रामसेवक मुख्यालयी न रहाता घरभाडे उचलतात कसे, यासह अन्य विषयांवरून उपसरपंच अमृत बसवदे व सदस्य मारुती मुगळे, जमीर मचकुरी, शिवाजी गुदळे, रुक्मिणीबाई जाधव, केराबाई हलगरकर, कमलताई दुधभाते, दैवत गायकवाड यांनी गुरुवारपासून ग्रामपंचायतीसमोर बेमुदत उपोषण सुरुवात केले होते.
सरपंच व ग्रामसेवक हे सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कारभार करीत आहेत. हिशोब मागितला असता तो देत नाहीत, असा आरोप उपसरपंच अमृत बसवदे यांनी केला. जोपर्यंत सर्व माहिती लेखी मिळत नाही तसेच ग्रामसेवक माळी यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पावित्रा घेतला.
गुरुवारी पंचायत समिती सभापती राधाताई बिरादार, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, विस्तार अधिकारी अंकुश धाकडे, ग्रामसेवक नागनाथ मलिले यांनी उपोषण स्थळास भेट देऊन १५ दिवसांत दोषींवर कारवाई करण्यात येईल व फेरतपासणी केली जाईल, असे लेखी आश्वासन दिले; परंतु उपसरपंच बसवदे यांनी या प्रस्तावास नकार देत उपोषण सुरूच ठेवले हाेते. शुक्रवारी माजी समाजकल्याण सभापती संजय दोरवे, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी भेट देत उपोषण सोडण्याचे आवाहन केले; पण ग्रामसेवक निखिल माळी यांचे निलंबन आदेश द्यावे, अशी मागणी पुन्हा करण्यात आली. अखेर सायंकाळी बीडीओंनी ग्रामसेवक माळी यांना निलंबित केले आहे.
हलगऱ्याचे ग्रामसेवक निखिल माळी यांना निलंबित करण्यात आले आहे. त्याची माहिती उपोषणकर्त्यांना विस्तार अधिकारी पोहोचवत आहेत, असे गटविकास अधिकारी अमाेल ताकभाते यांनी सांगितले.