जगळपूर येथील शेतकरी गजानन लोहकरे यांनी दीड एकर उसात साडेचार फुट अंतरात वरंबा पध्दतीने भुईमुग तसेच उसाच्या दोन्ही बाजूने कांद्याची लागवड केली आहे. दीड एकर उसात दोन बॅग भुईमूग व कांदा लागवड केली आहे. मशागतीसाठी साडेतीन हजार, ऊस बेण्यासाठी १० हजार, लागवड ५ हजार, भुईमुग बॅगसाठी ५ हजार, खत ३ हजार, लागवड ५ हजार, कांदा रोपासाठी ६ हजार, लागवडीसाठी २ हजार आणि ऊस खत, फवारणीसाठी १० हजार असा एकूण ४९ हजार ५०० रुपयांचा खर्च झाल्याचे सांगितले. खर्च वगळता या पिकांतून दीड ते पावणेदोन लाख रुपये उत्पन्न होईल, असे त्यांनी सांगितले.
शेतकरी लोहकरे म्हणाले, दीड एकरात ६५ ते ७० टन ऊस, भुईमूग ५० कट्टे तर कांद्याचे १५ ते २० क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. एकूण ८ एकर शेती असून दोन एकर खोडवा ऊस तर साडेचार एकर कोरडवाहू आहे. कमी क्षेत्र असल्यामुळे आणि स्वतः शेती करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी कार्यालयाकडून नेहमीच मार्गदर्शन मिळते, असेही ते म्हणाले.