अहमदपूर : ‘आम्ही जातो अमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा’ या निरोपा समयीच्या निरूपणात्मक अभंगांचे अभ्यासपूर्ण विवेचन केल्यानंतर संतश्रेष्ठ जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून चराचरातल्या जीवधारींनी कसे जगावे? तसेच संकटातून मार्ग कसा काढावा? याची शिकवण दिली आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा एक-एक शब्द म्हणजे मानवी जीवनाचा एक-एक सिद्धांत आहे. त्यांच्या अध्यात्मातून जीवन जगण्याची खरी शिकवण मिळते, असे प्रतिपादन ह. भ. प. प्रा. डॉ. अनिल मुंढे महाराज यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित संत तुकाराम महाराज बीज कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार होते. प्रा. डॉ. अनिल मुंढे म्हणाले, संत तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात प्रचंड संघर्ष केला. त्यांनी विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ विचारांच्या माध्यमातून समाजजागृतीचे कार्य शेवटपर्यंत केले.
प्राचार्य डॉ. वसंत बिरादार यांनी संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचे संसारिक व्यक्तिमत्व व अध्यात्मिक व्यक्तिमत्व यावर प्रकाश टाकला. प्रास्ताविक प्रा. डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. सतीश ससाणे, डॉ. संतोष पाटील, अजय मुरमुरे, वामन मलकापुरे यांच्यासह प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.