लातूर : कोरोना रुग्ण वाढत असले तरी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांच्या दिमतीला आहे. दरम्यान, एसी, पॅकबंद शिवनेरीला प्रवाशांची पसंती आहे. जिल्ह्यातून आज घडीला शिवनेरीच्या २० बस धावत आहेत. प्रवासी संख्या अर्ध्यावर आली आहे. तरीही कोरोनाचे साखळदंड तोडून एसटी सुसाट धावत आहे.
निलंगा-पुणे, अहमदपूर-पुणे, लातूर-पुणे, औसा-पुणे, कोल्हापूर- लातूर, सोलापूर-लातूर, नागपूर-लातूर, अहमदपूर-नागपूर, उदगीर-पुणे, उदगीर-हैद्राबाद, लातूर-हैद्राबाद या मार्गावर शिवनेरी धावत आहेत. निलंगा-पुणे, अहमदपूर-पुणे आणि लातूर-पुणे या मार्गावर येण्या-जाण्याच्या फेऱ्यांत ४० हजारांचे उत्पन्न मिळत होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या उत्पन्नात अर्ध्याने घट झाली आहे. १५ ते २० हजार रुपये येण्या-जाण्याला मिळत आहेत. लातूर, अहमदपूर, निलंगा, औसा, उदगीर या पाच डेपोंपैकी लातूर आणि उदगीर डेपोचे दिवसाला १४ लाखांचे उत्पन्न होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ते अर्ध्यावर आले आहे. अहमदपूर, निलंगा, औसा या तीन डेपोंचे दैनंदिन उत्पन्न १० लाखांच्या आसपास होते. ते आता ५ ते ६ लाखांवर आले आहे. तरीही एसटीने प्रवाशांसाठी सेवा सुरू ठेवली आहे.
या मार्गांवर आहे प्रवाशांचा प्रतिसाद
प्रवासी संख्या कमी झाली असली तरी या मार्गावर शिवशाहीला प्रतिसाद आहे. निलंगा-पुणे, अहमदपूर-पुणे, लातूर-पुणे, लातूर-कोल्हापूर, लातूर-सोलापूर, नागपूर-लातूर, अहमदपूर-नागपूर, उदगीर-पुणे, लातूर-हैद्राबाद, उदगीर-हैद्राबाद मार्गावर प्रवासी आहेत. शिवनेरीला या मार्गावर थोडा प्रतिसाद आहे. मात्र, उत्पन्न निम्म्याने घटले आहे.
५० हजारांचे उत्पन्न २० हजारांवर
कोल्हापूर-लातूर या मार्गावर जाण्या-येण्याच्या फेरीतून ५० हजारांचे उत्पन्न होते. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून १५ ते २० हजारांवर आले आहे. सोलापूर - मार्गावर १२ ते १५ हजार रुपये मिळत असत. ते ६ ते ७ हजारांवर आले आहे. अहमदपूर-नागपूर मार्गाला ४० हजार रुपये मिळत होते ते १५ ते २० हजारांवर आले आहे. उदगीर-पुणे या मार्गावर ३५ हजार रुपये मिळत होते ते ७ ते १० हजारांवर आले आहे.
लांब पल्ल्याच्या तसेच रातराणी अर्थात शिवनेरी वातानुकूलित बस प्रवाशांच्या दिमतीला आहेत. जिल्हाअंतर्गत प्रवासी वाहतूक ही सुरू आहे. मास्क घातल्यानंतरच एस.टी.मध्ये प्रवेश दिला जातो. उत्पन्नात ५० टक्के घट झाली असली तरी कुठल्याही मार्गावरील बस बंद केलेल्या नाहीत. प्रवाशांनी नियमांचे पालन करून सेवेचा लाभ घ्यावा.
- जाफर कुरेशी, आगार व्यवस्थापक