निलंगा पालिकेच्या वतीने शहरातील रस्ते खुले करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेस बुधवारपासून प्रारंभ करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी नगर, हाडगा रोड येथून ही मोहीम सुरू करण्यात आली होती. राजमाता जिजाऊ चौक ते उदगीर मोडपर्यंत शहराच्या उत्तर बाजूने ही मोहीम राबविण्यात आली. गुरुवारी निलंग्याचा आठवडी बाजार असल्याने एक दिवस ही मोहीम बंद ठेवण्यात आली होती.
शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात या मोहिमेस सुरुवात करण्यात आली. उदगीर रोड येथून शहरातील दक्षिण बाजूचे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले. व्यावसायिकांनी आपल्या दुकानाच्या जागेशिवाय अतिरिक्त रस्त्यावर दुकानाचे फलक लावल्याने ते काढण्यात आले. रस्त्याचा वापर वाहन उभे करण्यासाठी त्याचबरोबर दुकानातील साहित्य रस्त्यावर ठेवलेले आढळून आल्याने ते पालिकेच्या वतीने काढण्यात आले. यावेळी दुकानदार, व्यावसायिकांनी पालिका कर्मचाऱ्यांना विरोध केला, परंतु पालिकेने कडक धोरण राबविल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे अतिक्रमण हटविण्यात आले आहे. त्यामुळे या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक रमेश सोनी, कांबळे हे अतिक्रमणे काढत आहेत. यात सुमारे शंभर महिला व पुरुष कर्मचारी, एक जेसीबी व दोन ट्रॅक्टरचा समावेश आहे.
आणखीन तीन दिवस मोहीम...
शहरातील रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे. शहरातील नागरिक, व्यापाऱ्यांनी आपली अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावीत. अन्यथा मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे पालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितले.