-----------------------
आंबेडकर जयंतीच्या अध्यक्षपदी कांबळे
लातूर : आंवतीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या अध्यक्षपदी चंद्रमुनी कांबळे यांची निवड करण्यात आली. पंकज काटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. कार्यकारिणीत कार्याध्यक्ष सुनील कांबळे, उपाध्यक्ष किरण गायकवाड, ॲड. संजय गायकवाड, कुणाल कदम, कोषाध्यक्ष विशाल कांबळे, सचिव दशरथ सोनेरे, स्वागताध्यक्ष ॲड. केतन सातपुते, मच्छिंद्र आलटे, संदीप कांबळे तसेच किशोर कांबळे, अभिजित आपटे, गौतम ओव्हळ, कपिल कांबळे, शिरिश जोगदंड, अमोल सोनकांबळे, अजय शंके, पवन पवळे, अमित शिंदे, सचिन सोनवणे, प्रशांत वाघमारे, सूरज कांबळे, पवन सूर्यवंशी आदींचा समावेश आहे.
----------------
कार्याध्यक्षपदी संभाजी यांची निवड
लातूर : संभाजी ब्रिगेडच्या लातूर विभागीय कार्याध्यक्षपदी वैजनाथ संभाजी जाधव यांची निवड करण्यात आली आहे. बीड, उस्मानाबादसह लातूर जिल्ह्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली आहे. या निवडीबद्दल उमाकांत उपाडे, के.वाय. पटवेकर, किशोर शिंदे, शिरीष ढवळे, राम जगदाळे, मनोज तिवारी, अशोक सोमासे, अमोल आदमाने, मनोज तिवारी, संतोष भाडुळे आदींनी त्यांचे स्वागत केले.
---------------------------------------------
सूरज बनसोडे सेट परीक्षा उत्तीर्ण
लातूर : एस.बी. एज्युकेशनचे संचालक प्रा. सूरज दिगंबर बनसोडे हे डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या प्राध्यापकांच्या राज्य पात्रता परीक्षेत (सेट) उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य विषयातून त्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यांच्या या यशाचे कौतुक प्रा.चंद्रमनी बनसोडे, प्रा.विद्यासागर बनसोडे तसेच सहकारी शिक्षकांनी केले आहे.
---------------------------------
सात पोलिसांना कोरोनाची बाधा
लातूर : निलंगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फिल्डवर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही लागत होत आहे. निलंगा येथील पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्यांसह सहा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामुळे कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत असून, ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
--------------------------------------
शिक्षण मंडळाची विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाईन
लातूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने एप्रिल, मे मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेबाबत मंडळ स्तरावर हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ०२३८२-२५१७३३ व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ०२३८२-२५१६३३ या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून समस्या सोडविता येतील. विद्यार्थी, पालक व शाळा प्रमुखांनी आपल्या अडीअडचणींविषयी या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.
-----------------------
सलून दुकाने सुरू करण्याची मागणी
लातूर : सलूनचा व्यवसाय पूर्ववत सुरू करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. ब्रेक द चेन मोहिमेच्या नावाखाली हातावर पोट असलेल्या सलून व्यावसायिकांना फटका बसत आहे. यापुर्वी वर्षभर दुकाने बंद होती. दुकानभाडे, घरभाडे आणि घरप्रपंच भागवावा कसा, असा प्रश्न सलून व्यावसायिकांना पडलेला आहे. कोरोना नियमांच्या अटीच्या आधीन राहून व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नाभिक मंडळाने मागणी केली आहे.
----------------------------
लातूरला ३०९ तर उदगीरला ६०० रेमडेसिवीरचे वितरण
लातूर : लातूर जिल्ह्यात लातूरसाठी ३०९ आणि उदगीरसाठी ६० रेमडेसिवीर वाईल्स उपलब्ध झाले आहेत. लातूरच्या ३०९ रेमडेसिवीर वाईल्सपैकी २२८ मान्यताप्राप्त खासगी कोविड रुग्णालयांना वितरित करण्यात आले असून, उर्वरित ८१ रेमडेसिवीर खुल्या पद्धतीने वाटप करण्यासाठी शहरातील प्रकाश मेडिकल स्टोअर, मातोश्री मेडिकल स्टोअर आणि वारद मेडिकल स्टोअर या तीन औषधी दुकानांना वितरित करण्यात आले आहेत. उदगीर येथील ६ रुग्णालयांना ६० रेमडेसिवीर वितरित करण्यात आली असल्याची माहिती नोडल अधिकाऱ्यांनी दिली.