सध्याला भाजीमडईतील पालेभाज्यांचे दर सामान्यांच्या आवाक्यात असल्याने, कष्टकऱ्यांच्या ताटात भाज्या दिसून येत आहेत. मागील काही दिवसांमध्ये गॅस, पेट्रोल व डिझेलचे दर प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामध्ये भर म्हणून डाळींचे दरही वधारले आहेत. घरगुती गॅसच्या किंमत ८५० रुपयांच्या घरात गेली आहे. पेट्रोलने तर चक्क शंभरी गाठल्याने मध्यमवर्गीयांच्या खिशाला झळ बसत आहे. अशा स्थितीत हातावर पोट असलेल्या, असंघटित क्षेत्रातील कामगारवर्गावर उपासमारीचीच वेळ आली आहे. त्यातच मार्चअखेर असल्याने महावितरण कंपनीकडून थकलेल्या वीज बिलापोटी वीज पुरवठाच खंडित केला जात आहे. वीज बिलांच्या वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी तगादा लावत आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याने, मागील दोन महिन्यांपासून सामान्यांचे महिन्याचे बजेट काेलमडले आहे.
आणि डाळीही महागल्या...
डाळीचे दर दिवसेंदिवस वधारत आहेत. अशात बाजारात सध्याला भाजीपाला सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात मिळत आहे. परिणामी, काही प्रमाणात नागरिकांमध्ये समाधान व्यक्त हेत आहे. मात्र, आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. भाजीपालासुद्धा महाग होण्याची चिन्हे आहेत. सध्याला तूरदाळ १०५, उडीद १००, मूग १००, मसूर डाळ ८५, चना डाळ प्रतिकिलो ६५ तर पामतेल १२५, करडी तेल २००, शेंगदाणा तेल १७०, सोयाबीन तेल १४० , सूर्यफूल तेलाचा प्रतिकिलाेचा दर १५० रुपये आहे. परिणामी, सामान्य नागरिकांसह छोटे हॉटेलचालक, खानावळ व्यावसायिकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. दर वाढविले तर ग्राहक दुरावेल या भीतीपाेटी दरही वाढविता येत नाहीत. गतवर्षी कोरोनाच्या काळात बिघडलेले आर्थिक गणित अजूनही सुधारले नाही.
शेतीच्या मशागतीवर परिणाम...
डिझेलचे दर वाढल्याने शेतातील उन्हाळी मशागतीच्या कामासाठी नांगरटीच्या खर्चात यंदा दीडपट वाढ झाली आहे. मागील वर्षी टॅक्टरने नांगरटीचा एकरी दर १ हजार २०० हाेता. यंदा डिझेलच्या किमती वाढल्याने १ हजार ८०० रुपयांवर दर गेला आहे. यातून शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. आता शेतीचा खर्चही वाढला आहे, असे शेतकरी ज्ञानेश्वर नारागुडे म्हणाले, तर मागील दोन महिन्यांपासून खाद्यतेल, डाळ आणि गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ग्राहकांसाठी खाद्यपदार्थ तयार करताना प्रतिप्लेट मागील वर्षाच्या तुलनेत यंदा खर्च जास्तीचा येत आहे. दरवाढ केल्यास ग्राहक कमी होईल, या भीतीपोटी थोड्याफार मिळणाऱ्या नफ्यावर व्यवसाय करावा लागत आहे. असे हाॅटेल चालक आकाश हजारे म्हणाले.