शिरूर अनंतपाळ : रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते सर्वश्रेष्ठ असते. याचा प्रत्यय येथील क्लासमेट ग्रुपने अनोख्या उपक्रमातून दाखवून दिला आहे. वर्गमित्राच्या निधनानंतर सांत्वनाची औपचारिकता दाखविली नाही, तर रोख ९१ हजार रुपयांची मदत कुटुंबास देऊन मैत्रीच्या नात्याला आर्थिक मदतीची किनार जोडली आहे.
शिरूर अनंतपाळ येथील पेंटिंग व्यवसायातील संतोष दुरूगकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून, आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच दुरूगकर यांच्या बालपणापासून वर्गमित्र असणारा क्लासमेट ग्रुप एकत्र आला आणि त्यांनी रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचे नाते सर्वश्रेष्ठ असते, हे दाखवून दिले. मित्राच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वनाची औपचारिकता न दाखविता क्लासमेट ग्रुपच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी देवंगरे यांच्या पुढाकाराने रोख ९१ हजार रुपये जमा केले आणि अनंतपाळ नूतन विद्यालयाचे सचिव तथा ग्रुपचे तत्कालिन मुख्याध्यापक प्रभाकरराव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष दुरूगकर यांच्या पत्नी मनीषाताई दुरूगकर यांना ही आर्थिक मदत दिली. ग्रुपच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
ग्रुपचा आदर्श घ्यावा...
ग्रुपने अनोख्या उपक्रमातून मैत्रीचे नाते श्रेष्ठ असते, हे दाखवून दिले आहे. ग्रुपच्या या उपक्रमाचा सर्वांनी आदर्श घ्यावा, असे मत प्रभाकरराव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. दिलेली ही आर्थिक मदत अविस्मरणीय असून, प्रेरणादायी आहे. त्यामुळे मुला, मुलींच्या शैक्षणिक कार्यावर खर्च करून त्यांचे भवितव्य उज्ज्वल करणार असल्याची भावना मनीषाताई दुरुगकर यांनी व्यक्त केली.