लातूर : लाॅकडाऊनमुळे रोजगार गेलेल्यांना आता शिवभोजन थाळीचा आधार मिळणार आहे. जिल्ह्यातील २० केंद्रांवरून दररोज ४१० ग्रॅमची थाळी गरजवंतांच्या पोटाला आधार बनणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदीचा आदेश दिला आहे. या संचारबंदीच्या काळात बेरोजगारांची उपासमार होऊ नये म्हणून शिवभोजन केंद्रातून ४१० ग्रॅमची थाळी दिली जाणार आहे. ७ ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅम वरण, १५० ग्रॅम भात आणि १०० ग्रॅम भाजी असून, एकूण ४१० ग्रॅमची ही थाळी असेल. जिल्ह्यातील २० केंद्रांतून २,२०० थाळी गरजवंतांना देण्याचे नियोजन आहे. त्यात शासनाच्या आदेशानुसार वाढही होऊ शकते. २० केंद्रांपैकी ७ केंद्रे लातूर शहरामध्ये आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या केंद्रांतून मोफत थाळी मिळणार आहे. मागील लाॅकडाऊनमध्ये अनेक गरजवंतांनी शिवभोजन थाळीचा लाभ घेतला आहे. नियमित लाभ घेणाऱ्यांचीही संख्याही अधिक असते, असे अनेक केंद्रचालकांनी सांगितले.
२,२०० जणांना मिळतो दररोज लाभ
२० केंद्रांतून दोनशे जणांना दररोजच शिवभोजन थाळीचा लाभ दिला जातो. शहरातील सात केंद्रांपैकी एमआयडीसी परिसर, शिवाजी चौक, रेणापूर चौक आदी ठिकाणी केंद्रे आहेत.
यातील काही केंद्रे शंभर, तर काही ७५, तर काही १५० आणि २०० थाळींचे आहेत. सर्वांमिळून २,२०० थाळी लाभार्थ्यांना मिळतात.