गत खरीप हंगामात ऐन काढणीच्या कालावधीत अतिपाऊस तसेच निकृष्ट दर्जाच्या बियाणांमुळे जिल्ह्यात सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली आहे. त्यामुळे बाजार समितीत होणारी आवकही कमी होत होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीन खाद्यतेल आणि सोयाबीन पेंडीला मागणी वाढली आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून दरात सातत्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत ३ हजार ८८० रुपये प्रतिक्विंटल दर असला तरी दोन महिन्यांपासून त्यापेक्षा अधिक दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना त्याचा लाभ होत आहे. सध्या आवक घटली असून शनिवारी केवळ ७ हजार ८०१ क्विंटल आवक झाली होती.
खुल्या बाजारपेठेत सोयाबीनला अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेडअंतर्गतच्या हमीभाव खरेदी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. परिणामी, यंदाच्या हंगामात सोयाबीनची एक रुपयाची खरेदी झाली नसल्याचे नाफेडचे जिल्हा मार्केटिंग अधिकारी वाय. ई. सुमठाणे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना २ हजारांपर्यंत अधिक लाभ...
शनिवारी लातूरच्या बाजार समितीत ७ हजार ८०१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. कमाल दर ६ हजार १००, सर्वसाधारण ५ हजार ९७० तर किमान ५ हजार ८१४ रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना जवळपास २ हजार ९० रुपयांपर्यंत अधिक रक्कम मिळत आहे, असे बाजार समितीकडून सांगण्यात आले.