शिरुर अनंतपाळ तालुक्यात ४२ ग्रामपंचायती असल्या तरी त्यातील २७ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची मुदत जुलैमध्ये संपुष्टात आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या २७ ग्रामपंचायतींवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, प्रत्येक गावातील सरपंचपदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले. आता नव्याने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. अंतिम मतदार यादी जाहीर करण्यासाठी तीन टप्प्यात तहसील कार्यालयाकडून नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील २७ गावांत निवडणुकीचे इच्छुकांना वेध लागले आहेत.
७ डिसेंबरपर्यंत हरकती...
पहिल्या टप्प्यात प्रारुप मतदार यादी जाहीर करण्यात येणार असून, दुसऱ्या टप्प्यात ७ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती स्विकारण्यात येणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात १० डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. २७ गावांतील पात्र मतदारांनी प्रारुप मतदार यादीचा अभ्यास करून दावे आणि हरकती दाखल करुन अंतिम मतदार यादीत दुरुस्ती करुन घ्यावी, असे आवाहन तहसीलदार अतुल जटाळे, लेखाधिकारी नितीन बनसोडे यांनी केले आहे.