लातूर : मागणी तसा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिमेची गती थंडावली असली तरी आरोग्य विभाग लस मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळेच आतापर्यंत दोन्ही मिळून २ लाख ३५ हजार १८९ डोस घेतले आहेत. २ लाख १ हजार ४७० व्यक्तींनी पहिला डोस घेतला आहे. यातील अनेकांची दुसरा डोस घेण्याची मुदत संपली असली तरी त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. आठ-दहा दिवस इकडे तिकडे होऊ शकतात, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख १ हजार ४७० जणांनी पहिला डोस, तर ३४ हजार ७१९ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. दोन्ही डोस मिळून २ लाख ३५ हजार १९० वर संख्या गेली आहे. दररोज थोड्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. त्यात वाढ होईल. बुधवारी दुपारपर्यंत २४ हजार डोसेस उपलब्ध होणार आहेत. यातील १२ हजार ९०० डोसेस कोविशिल्डचे. तर १२ हजार ९०० डोसेस कोव्हॅक्सिनचे मिळणार आहेत. ज्यांची मुदत संपली आहे, त्यांनाच प्राधान्याने या उपलब्ध डोसेसमधून लस दिली जाणार आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी घाबरू नये, असे जिल्हा आरोग्याधिकारी डाॅ. गंगाधर परगे म्हणाले.
दुसऱ्या डोससाठी सहा आठवडे थांबा
कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन सहा आठवडे झाले, त्यांना प्राधान्याने लस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. तर कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन ज्यांचे चार आठवडे पूर्ण झाले आहेत, त्यांनाही प्राधान्याने दुसरा डोस देण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
मागणीप्रमाणे पुरवठा होत नसला तरी ज्यांची पहिला डोस घेऊन मुदत संपत आहे, त्यांचा प्राधान्याने अगोदर विचार केला जात आहे. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नाही. लस उपलब्ध होत आहे. उद्या दुपारपर्यंत कोविशिल्डचे १२ हजार ९०० डोस उपलब्ध होणार आहेत. सदर डोसचा वापर ज्याची मुदत संपली त्यांनाच केला जाणार आहे. तर १८ ते ४४ वयोगटासाठी कोव्हॅक्सिनचे १२ हजार डोस उपलब्ध होणार आहेत. त्यांनाही यातून लस दिली जाणार आहे. पात्र लाभार्थी एकही लसीकरणापासून वंचित राहणार नाही, यासंबंधी खबरदारी आरोग्य विभागाने घेतली आहे.