लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : पावसाळ्यात अग्नीमंद असतो. भूक कमी लागते. या मोसमात प्रतिकारशक्ती कमी असल्याने सकस आणि सात्विक आहाराकडे लक्ष देण्याची गरज असते. त्यामुळे तळलेले, उघड्यावर ठेवलेले अन् गोड पदार्थ खाणे टाळायला हवेत, असा सल्ला आयुर्वेद तसेच आहारतज्ज्ञांनी दिला आहे.
कोरोनामुळे हाॅटेल्स आणि रेस्टाॅरंट बंद होती. त्यामुळे अनेकांना जीभेचे चोचले पुरवता आले नाहीत. आता हाॅटेल्स सुरु झाली आहेत. परंतु, पावसाळा असल्याने जीभेचे चोचले पुरविणे आणखी काही दिवस टाळावे, असा सल्ला आहार आणि आयुर्वेद तज्ज्ञांनी दिला आहे. आहार आणि दिनचर्या नियमित नसल्याने पावसाळ्यात रोगराई पसरू शकते. ही रोगराई टाळण्यासाठी शुद्ध पाणी आणि सकस आहार महत्त्वाचा आहे. आहारात ज्वारीची भाकरी, मूगडाळ आणि फळांचा वापर गरजेनुसार करावा, असाही सल्ला दिला आहे.
रस्त्यावरील उघडे ठेवलेले अन्न नकोच
पावसाळ्यात अनेकजण तळलेल्या पदार्थांवर अर्थात भजींवर ताव मारतात. परंतु, हे पदार्थ खाणे हानिकारक आहे. पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू व अन्य जलजन्य आजार उद्भवतात. त्यामुळे शुद्ध पाणी आणि सकस आहार घेणे आवश्यक आहे. प्रोटीनसाठी मांसाहार आवश्यक आहे. परंतु, या मोसमामध्ये त्याचा वापर कमी प्रमाणात होणे गरजेचे असते. मांसाहार जड खाद्यपदार्थ आहे. या मोसमात मीठाचे प्रमाणही कमी असायला हवे. हाॅटेलमधील तळीव पदार्थ सेवन करणे टाळले पाहिजे.
पावसाळ्यात अग्नीमंद असतो. भूक कमी लागते. त्यामुळे जड अन्न खाणे टाळायला हवे. मांसाहार, तळलेले आणि उघड्यावर ठेवलेले पदार्थ खाऊ नयेत. दिनचर्या नियमित असावी. व्यायाम, योगा, विपश्यना करावी. प्रतिकारशक्ती कमी असलेला हा मोसम आहे. त्यामुळे या हंगामात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
- डाॅ. सुधीर बनशेळकीकर, आयुर्वेद
पावसाळ्यात प्रतिकारशक्ती कमी असते. सर्दी, ताप, खोकला असे आजार उद्भवू शकतात. त्यामुळे सकस आहार घेणे गरजेचे. व्यायामावरही लक्ष असणे आवश्यक. सफरचंद, डाळिंब, जांभूळ, पपई आदी फळे आहारात घ्यावीत. कच्चे सलाड खाण्याऐवजी उकडलेले सलाड घेणे फायदेशीर ठरेल. मीठ अल्प आणि कोमट पाण्याचा वापर आवश्यक.
- डाॅ. नितील लहाने, आहारतज्ज्ञ