लातूर : जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार १५६ जणांचा कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला असून, यातील ६४७ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तदाब, आदी आजार होता. त्यामुळे कोरोना वाढून या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाच्या मृत्यू विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६६ हजार ५४८ जणांना कोरोनाची लागण झाली. यांतील ५० हजार ८०८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र दुर्दैवाने ११५६ जणांचा मृत्यू झाला. मृत झालेल्यांपैकी ५५.९६ टक्के जणांमध्ये इतर आजार होते. त्यामध्ये मधुमेह, रक्तदाब, उच्च रक्तदाब, किडनी व अन्य आजारपीडित होते. त्यातच कोरोनाची लागण होऊन या रुग्णांचा मृत्यू झाला.
मृत झालेल्या एक हजार १५६ पैकी ४९८ जणांचे वयही ७० वर्षांच्या पुढील होते; तर ६० वर्षांच्या पुढील ३४२ जणांचा यात मृत्यू झालेला आहे. ५० वर्षांच्या पुढील १८६ आणि ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या १७० जणांचाही कोरोनाने बळी घेतला आहे. ११५६ मृतांपैकी ५०९ जणांमध्ये अन्य कुठलेही आजार नव्हते. फक्त कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे, असेही आरोग्य विभागाने दिलेल्या विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे. सर्वाधिक मृत्यू उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तदाब आणि वयोवृद्ध असल्याने झाला आहे. यातील १०७ जणांचा दवाखान्यात दाखल झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मृत्यू झाला आहे.