लातूर : कार्यालयीन वेळ सकाळी ९.४५ ची असताना जिल्हा परिषदेचा पाणी पुरवठा विभाग, अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी विभाग, शहर महापालिका यासह विविध विभागांत सकाळी १०.२० वाजता शुकशुकाट पहायला मिळाला. काही विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चक्क रिकाम्या खुर्च्यांचे दर्शन झाले. त्यामुळे आपली कामे घेऊन आलेले नागरिक कर्मचाऱ्यांच्या शोधात आवारात फिरताना दिसून आले.
शासनाने पाच दिवसांचा आठवडा केला आहे. शुक्रवारी ख्रिसमस नाताळ, शनिवार, रविवारची सुटी अशा सलग तीन दिवस सुट्या असूनही सोमवारी शासकीय कार्यालयांत कर्मचारी वेळेवर आले नसल्याचे जिल्ह्यातील चित्र होते. अनेक जण सकाळी १०.४५ नंतरच कार्यालयात आले. त्यामुळे अनेक नागरिक कर्मचाऱ्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत होते.
प्रशासन लक्ष देणार का?
जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयांत ९.४५ ची वेळ असताना काही कर्मचारी वेळेवर हजर होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून आपली कामे घेऊन आलेल्या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे शासकीय कार्यालयात उशिरा येणाऱ्या लेटलतिफांवर प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न आहे.
नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचना
वेतन अधीक्षक कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात येतात. सर्वच कर्मचारी वेळेवर येतात. कोणी उशिरा आल्यास दुसऱ्या रजिस्टरमध्ये नोंद केली जाते. त्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जातो.
- एस.व्ही. क्षीरसागर,
वेतन अधीक्षक कार्यालय