चाकूर : शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास धरावी म्हणून कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी किसान ॲप सुरू केले आहे. त्या माध्यमातून शेती, हवामानाची माहिती संदेशाद्वारे दिली जाते. त्याचा काही प्रमाणात शेतकऱ्यांना फायदाही होतो. परंतु, काही दिवसांपासून देण्यात येणारे संदेश हे मोसम संपल्यानंतर येत असल्याने शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होत आहे.
किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामान, अतिवृष्टी, वातावरणाची माहिती, पीकपाणी, पिकांवरील रोगराई, त्यासाठी नियोजन आदी माहितीचे संदेश दिले जातात. ही माहिती शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या ॲपद्वारे दिले जाणारे संदेश दोन- तीन दिवस उशिरा मिळत आहेत. १४ व १५ मे रोजी लातूर, उस्मानाबाद, नांदेड व बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता आहे. हा संदेश १८ मे रोजी रात्री ९.५७ वा. शेतकऱ्यांच्या मोबाइलवर आला. मराठवाड्यात १७ व १८ मे रोजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा संदेश ग्रामीण कृषी मौसम सेवा परभणीच्या वतीने देण्यात आला. तो संदेश १९ मे रोजी सकाळी ७.०६ वा. शेतकऱ्यांना मिळाला.
सध्याचे तंत्रज्ञानाचे युग असतानाही वेळ संपल्यावर संदेश येत आहेत. पूर्वी पोस्टातून येणारी तार (टेलिग्राम) पत्र, नोकरीचा कॉल हे तारीख निघून गेल्यावर मिळाल्याचे अनेकांना ऐकिवात आहे. त्यास किसान ॲपच्या संदेशामुळे उजाळा मिळत आहे.
जूनपासून पावसाळा सुरू होत आहे. आगामी काळात तरी किसान ॲपवरून दिले जाणारे संदेश, सावधानतेचे इशारे हे किमान एक-दोन दिवस अगोदर मिळावेत, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कृषी विभागाने लक्ष द्यावे...
किसान ॲपच्या माध्यमातून मिळणारे संदेश शेतक-यांसाठी महत्वाचे आहेत. त्यावर आम्हाला शेती करताना चांगला उपयोग होतो. गेल्या काही दिवसांपासून येणारे संदेश उशिरा येत आहेत. त्यामुळे वरातीमागून घोडे असा प्रकार घडत आहे. पूर्वीप्रमाणे हे संदेश यावेत.
- नागनाथ पाटील, शेतकरी, चाकूर.
काही शेतकऱ्यांच्या तक्रारी...
किसान ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती दिली जाते. ही माहिती उशिरा येत असल्याच्या तक्रारी येत आहेत. वरिष्ठांना याची माहिती देऊन पूर्वीप्रमाणे संदेश येण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- बी.आर. पवार, तालुका कृषी अधिकारी.