जळकाेट तालुक्यातील हावरगा साठवण तलावात सध्याला केवळ १३ टक्केच पाणी शिल्लक असून, उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. बाष्पीभवनामुळे पाणीपातळीत माेठ्या प्रमाणावर घट हाेत आहे. चार गावांसाठी लागणारे पाणी आरक्षित करणे गरजेचे असताना, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आराेप ग्रामस्थांतून हाेत आहे. परिणामी, आता या चारही गावांत पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मार्च महिन्यातच घाेटभर पाण्यासाठी नागरिकांसह पशुधनालाही भटकंती करावी लागत आहे. एकीकडे तलावात अल्पसाठा आहे, तर दुसरीकडे काही शेतकऱ्यांकडून माेटारीच्या माध्यमातून पाण्याचा माेठ्या प्रमाणावर उपसा केला जात आहे. संबंधित प्रशासनाकडून तातडीने उपाययाेजना म्हणून तलावावरील मोटारी काढण्यात याव्यात, अशी मागणी जगळपूर, येलदरा, हावरगा, डोमगाव येथील ग्रामस्थांतून हाेत आहे.
पाच तलावांतील पाणीसाठा अल्प
जळकोट तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावामध्ये सध्याला उपलब्ध पाण्याची टक्केवारी ५० टक्क्यांच्या खाली आहे. यामध्ये हावरगा तलावात १३ टक्के, ढोरसांवी २४ टक्के, जंगमवाडी ११ टक्के, माळहिप्परगा ४३ टक्के, तर केकतसिंदगी तलावात ३१ टक्के पाणी शिल्लक आहे, असे शाखा अभियंता त्रिपाठी, डी.बी. शेख म्हणाले. जळकाेट तालुक्यातील पाच तलावांत असलेल्या अल्प पाणीसाठ्यामुळे भविष्यात गावांचा पाणी प्रश्न गंभीर बनणार आहे. यासाठी आहे ताे पाणीसाठा आता आरक्षित करण्याची गरज आहे.