इंजेक्शनचा वापर करण्याबाबत खाजगी डॉक्टरांना बंधने घातली जात आहेत. नियम किचकट आणि अनेक प्रकारच्या रिपोर्टमध्ये डॉक्टरांना व्यस्त केले जात आहे, असे नमूद करून माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी म्हटले आहे, कामकाजाची पद्धत सोपी करा. इंजेक्शन कोणाला द्यायचे, हे डॉक्टरांवर सोपवा. त्याच्या वापराबाबतची आणि वितरणाबाबतची आचारसंहिता जाहीर करा. जिल्ह्यात रुग्ण वाढत आहेत. मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे, ही बाब चिंतेची आहे. अशावेळी रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर रेमडेसिविर इंजेक्शनसाठी धावपळ करीत आहेत. जितक्या प्रमाणात खाजगी रुग्णालये मागणी करतात, तितका पुरवठा होत नाही. दुसरीकडे सरकारी रुग्णालयांमध्ये इंजेक्शन उपलब्ध असले, तरी त्याच्या वापराबाबत योग्य निकष करणे गरजेचे आहे. गरजूंना इंजेक्शन सुलभ पद्धतीने उपलब्ध झाले पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे.
रुग्णालयांमध्ये जागा उपलब्ध नाहीत, अशा तक्रारी येतात. त्यामुळे सर्व शासकीय रुग्णालयांत, वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांत तसेच खाजगी रुग्णालयांत किती जागा उपलब्ध आहेत, याची माहिती बुलेटिन पद्धतीने द्यावी, असेही निलंगेकर यांनी म्हटले आहे.