लातूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात रात्री ८ नंतर संचारबंदीची अंमलबजावणी सोमवारी सुरू झाली. एकीकडे संचाराला बंदी, तर दुसरीकडे महापालिकेच्या वीजबिल थकबाकीमुळे महावितरणने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित करून लातूर शहरात अंधार केला. परिणामी, संचारबंदीची अंमलबजावणी अंधारात सुरू झाली आहे.
महापालिकेने थकबाकी भरली, तर शहराच्या मुख्य रस्त्यांवरील अंधार दूर होईल अन् मास्कच्या वापरावर कठोर दंडात्मक कारवाई सुरू ठेवली, तर कोरोनाचा संसर्ग कमी होईल. दोन्हीही ठिकाणी प्रशासन किती तत्पर राहील आणि जनतेचा प्रतिसाद कसा मिळेल, यावरच संचारबंदी हटणे आणि अंधार दूर होणे अवलंबून आहे. दरम्यान, मनपाने ९० लाख रुपयांचे देणे थकविल्यामुळे महावितरणने सोमवारी पथदिव्यांचा वीजपुरवठा तातडीने खंडित केला आहे. त्यामुळे पोलीस अन् नागरिकांची गैरसोय झाली.
महावितरणचा आडमुठेपणा...
n ४१ लाखांचा धनादेश तयार आहे, परंतु बँकांच्या संपामुळे महावितरणच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. दोन दिवसांत ते जमा होतील. यापूर्वी ८५ लाखांची थकबाकी भरली आहे. वीज खंडित करणे आडमुठेपणाचे आहे. - चंद्रकांत बिराजदार, उपमहापौर
संचारबंदी लवकर हटावी...
n संसर्ग वाढू नये, म्हणून प्रशासनाने रात्री ८ नंतर संचारबंदी केली आहे, परंतु मास्क, फिजिकल डिस्टन्स व सॅनिटायझरचा वापर कठोरपणे करून प्रशासनाने नागरिकांच्या सहकार्याने लवकरात लवकर संचारबंदी हटविली पाहिजे, असा सूर व्यावसायिकांतून उमटत आहे.