अहमदपूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केल्याने फळविक्री व्यवसायावर परिणाम झाला आहे. परिणामी, आंबे जागीच सडत असल्याने फळविक्रेते संकटात सापडले आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे फळविक्री करणाऱ्यांवर संक्रांत आली आहे. ज्या व्यावसायिकांनी चिकू, पपई, टरबूज, खरबुजासह आंबे आणून ठेवले आहेत, त्यांच्याकडील फळे जागीच सडत आहेत. त्यामुळे फळविक्रेत्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
दरवर्षी आंबा खरेदी-विक्रीत लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल होते. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे ग्राहक नाहीत. ज्या व्यापाऱ्यांनी हापूस व इतर जातीचे कोकण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरातमधून आंबे मागविले होते, ते व्यापारी आता मिळेल त्या किमतीत विक्री करीत आहेत. त्यामुळे भावातही घसरण झाली आहे.
व्यापाऱ्यांकडून होम डिलिव्हरी केली जात आहे, तसेच गोदामात आंबे पडून आहेत. बहुतांश व्यापाऱ्यांकडील आंबे खराब होत आहेत. भावात ५० ते ६० टक्के घट आली आहे.
यंदा आंब्याला कमी मागणी असल्याने भावातही मोठी घसरण झाली आहे. बाहेरून मागविलेला हापूस, केसर, लालबाग, बदाम व इतर आंबे विक्रीअभावी खराब होऊ लागल्याने मिळेल त्या भावातच विक्री करीत असल्याचे आंबा विक्रेते जावेद फकीरसाब बागवान यांनी सांगितले.