हाळी हंडरगुळी परिसरात गत खरीप हंगामात अति पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. दरम्यान, शेतक-यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभागी होऊन पीकविमा भरला होता. हाळी शिवारात ४९५ हेक्टरवर तर हंडरगुळी शिवारात ४२० हेक्टरवर सोयाबीन पिकाची पेरणी झाली होती. त्यापैकी बहुतांश शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने नुकसान झाले. शासनाने त्याची दखल घेऊन नुकसानभरपाईपोटी अनुदान दिले. मात्र प्रधानमंत्री पीकविमा योजनेतंर्गत दोन, तीन टक्के शेतकऱ्यांना पैसे मिळाले. तेही नाममात्रच. अन्य शेतकऱी अजूनही मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. प्रशासनाने त्याची दखल घ्यावी, अशी मागणी नागोराव चिमनदरे, अजित दापके, दयानंद शेळके, शिवाजी माने, शंकर शेळके, अजित भोसले, गोपाळराव भोसले, कांताबाई बोळेगावे आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
हंडरगुळी येथील शेतकरी बाबुराव शेळके यांच्या २ हेक्टर ९० आर क्षेत्रावर असलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले होते. मात्र त्यांना नुकसानीच्या प्रमाणात फारच कमी विमा रक्कम मिळाली आहे. त्यांनी याबाबत तहसीलदाराकडे निवेदन दिले आहे.
सोयाबीन पीक नुकसानीची पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली आहे. शासनाची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांना मिळाली आहे. पीकविम्याचे पैसे हे विमा कंपनी देते, असे कृषी सहाय्यक संजयसिंह चौहाण यांनी सांगितले.